देशाचे रेल्वेमंत्री कोण? - स्वराज

    नवी दिल्ली - रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्या राजीनाम्याची तृणमूल कॉंगे्रसने केलेली मागणी आणि त्यावर गंभीरपणे विचार करण्याचे सरकारने दिलेल्या आश्‍वासनाचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. आजवर कुठल्याही सरकारमध्ये अशी स्थिती उद्‌भवलेली आठवत नाही. हे सरकार अतिशय दुबळे आहे, असा आरोप करताना, त्रिवेदी यांनी बुधवारी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पाचे काही भवितव्य आहे काय? देशाचे रेल्वेमंत्री कोण आहेत? असे सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केलेत. याच मुद्यावरून राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
    विरोधकांनी त्रिवेदी यांच्या कथित राजीनाम्याचा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केल्यानंतर, लोकसभेतील नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. केवळ तृणमूल कॉंगे्रसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याकडून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना त्रिवेदी यांना मंत्रिमंडळातून वगळण्याबाबतचे पत्र मिळाले आहे. सरकार त्यावर विचार करीत आहे.
    लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी, त्रिवेदी अजूनही मंत्रिपदावर कायम आहेत काय, असा सवाल केला आणि संपुआतील आघाडीच्या राजकारणाने अतिशय खालचा स्तर गाठला असल्याचा आरोप केला. यावर, मुखर्जी यांनी, ‘आघाडीच्या राजकारणात अशा समस्या उद्‌भवतच असतात,’ असे संतापानेच सांगितले. भाजपानेही सहा वर्षे आघाडीचे राजकारण चालविले आहे. अशा राजकारणात कुठल्या प्रकारच्या समस्या येत असतात, याची चांगली माहिती भाजपातील मंडळींना आहे, असे ते म्हणाले.
    बुधवारी संसदेत सादर झालेला रेल्वे अर्थसंकल्प आता संसदेची संपत्ती असल्याने या अर्थसंकल्पाचे काही भवितव्य आहे काय, असा सवाल स्वराज यांनी केला. यावेळी सुषमा स्वराज, जदयुचे नेते शरद यादव, माकपचे वासुदेव आचार्य आणि भाकपाचे गुरुदास दासगुप्ता यांनी प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्यात यावा, यासाठी नोटीस सादर केली. त्रिवेदी मुद्यावर सरकारने स्पष्टीकरण द्यायलाच हवे आणि त्यासाठी प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करण्यात यावा, अशी मागणी या सदस्यांनी केली. तथापि, सभापती मीराकुमार यांनी नोटीस अमान्य करीत, सदस्यांना या मुद्यावर बोलण्याची परवानगी दिली.
    राज्यसभा तहकूब
    त्रिवेदी यांच्याच मुद्यावरून विरोधी सदस्यांनी राज्यसभेत गोंधळ घातला. सरकारने भूमिका स्पष्ट करायलाच हवी, अशी जोरदार मागणी करून सदस्यांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.
    या वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी हा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित केला. सरकारमध्ये अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. एकामागोमाग मंत्री राजीनामे देत आहेत, असे ते म्हणाले. यावर संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी, त्रिवेदी यांचा राजीनामा पंतप्रधानांना प्राप्त झालेला नाही, असे उत्तर दिले. त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी, ‘ममता की चली रेल, सरकार हो गई फेल’ अशा घोषणा दिल्या. या गोंधळातच अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Thursday, March 15, 2012,
Filed under - , , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS