ऑस्करचे मानकरी

 ८४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा बराचसा अपेक्षित वळणाने गेला. ‘ह्युगो’ आणि ‘दि आर्टिस्ट’ यांना सर्वाधिक नामांकने होती. त्यांनी प्रत्येकी पाच ऑस्कर जिंकून ही नामांकने सार्थ ठरवली. अभिनयातली सर्व ऑस्करही फेवरीट मंडळींनाच मिळाली. ‘ह्युगो’ने तांत्रिक पुरस्कारांमध्ये बाजी मारली तर बहुतेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांवर ‘दि आर्टिस्ट’ने मोहोर उमटवली.
फ्रेंच क्रांतीवीर- ज्यॉं दुजार्दिनचे नाव गेल्या वर्षी हॉलीवूडमध्ये कोणालाही माहीत नव्हते. मायकेल हॅझानाविश्यस या फ्रेंच दिग्दर्शकाने काही फ्रेंच मंडळींना घेऊन हॉलीवूडमध्ये ‘दि आर्टिस्ट’ बनवायला सुरुवात केली. यात ‘थँक यू’ हे दोन शब्द सोडल्यास संवाद नाही. कारण कथा मूकपटाच्या अस्तावर बेतलेली होती. दीड कोटींचा हॉलीवूडमध्ये ‘लो बजेट’ गणला जाणारा हा सिनेमा हार्वे वाइनस्टीन या तगडया निर्मात्याला गवसला. या अस्सल कलाकृतीचे मार्केटिंग व्यवस्थित झाले. दुजार्दिन तर स्टार झाला. एरवी फ्रान्समध्ये एक टीव्ही अभिनेता इतकीच त्याची ओळख होती. ‘दि आर्टिस्ट’ गेल्या वर्षी कान महोत्सवामध्ये दाखवला गेला. त्यावेळी दुजार्दिनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले नि हा प्रवास गोल्डन ग्लोब, बाफ्टा, स्क्रीन ऍक्टर्स गिल्ड अशा विविध पारितोषिकांद्वारे सुरू राहिला. त्यामुळेच यंदा बेस्ट ऍक्टर विभागात दुजार्दिनची टक्कर ब्रॅड पिट आणि जॉर्ज क्लूनी या ग्लॅमरस अभिनेत्यांशी होती. पण दुजार्दिनच फेवरिट होता. तो पहिला फ्रेंच ऑस्कर विजेता कलाकार ठरला.
मेरिल स्ट्रीपची हॅटट्रिक- हॉलीवूडमधील बुजुर्ग अभिनेत्री मेरिल स्ट्रीप हिला ‘दि आयर्न लेडी’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यावर आधारित ही भूमिका स्ट्रीपने फारच समयोचित वठवली आहे. स्ट्रीपचे हे तिसरे ऑस्कर. यापूर्वी १९७९ मध्ये ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ (सहायक अभिनेत्री) आणि १९८२ मध्ये ‘सोफीज् चॉइस’ (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) अशी दोन ऑस्कर तिच्याकडे होती. स्ट्रीपचे हे विक्रमी १७ वे नामांकन होते. १९७०, १९८०, १९९०, २००० आणि सध्याचे अशा चारपैकी प्रत्येक दशकांत या जबरदस्त अभिनेत्रीने नामांकन मिळवलेले आहे. यात सलग १२ वेळा नामांकन मिळून ऑस्कर न जिंकण्याची नामुष्कीही तिला सहन करावी लागली. तीन ऑस्कर मिळवून ती जॅक निकोलसल, इनग्रीड बर्गमन, वॉल्टर ब्रेनन यांच्या पंक्तीत जाऊन बसली.
ऑस्करचा धाकटा भाऊ- ‘बिगिनर्स’ या सिनेमातील भूमिकेसाठी ख्रिस्तोफर प्लमर यांना सहायक अभिनेत्याचे ऑस्कर मिळाले आणि एक विक्रम घडला! ८२ वर्षाचे प्लमर ऑस्कर जिंकणारे सर्वात वयोवृद्ध अभिनेते ठरले. ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा सिनेमा आणि स्टार ट्रेकमधील कॅप्टन कर्कच्या भूमिकेमुळे सुपरिचित असलेले प्लमर यांचे हे पहिलेच ऑस्कर ठरले. ८४ वर्षाचे ऑस्कर आपल्यापेक्षा केवळ दोन वर्षानी मोठे आहे. ‘दोन वर्षे कुठे होतास’ हा ऑस्करची बाहुली हातात घेऊन त्यांनी केलेला सवाल खसखस पिकवून गेला.
ऑस्कर आणि इराण- इराण सध्या जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिका आणि इस्त्रायल इराणचा अण्वस्त्रविकास कार्यक्रम दाबून टाकण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. या परिस्थितीत ऑस्करमध्ये इराणी सिनेमाची उपस्थिती हा आश्चर्याचा पहिला धक्का होता. ‘द सेपरेशन’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बिगर-इंग्लिश विभागात (फॉरेन फिल्म) नामांकन होते. आश्चर्याचा दुसरा मोठा धक्का या सिनेमाला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर बसला. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ बाजूला ठेवून ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने इराणी सिनेमाला सर्वोत्कृष्ट ठरवणे हाही एक धक्काच होता. दिग्दर्शक असगर फरहादी यांनी स्टेजवर केलेले छापील भाषण खूपच वेगळे ठरले. ‘युद्ध, हल्ले अशी चर्चा राजकीय नेत्यांमध्ये सुरू असताना, इराणचा उल्लेख त्याच्या समृद्ध संस्कृतीसंदर्भात व्हावा ही जगभरच्या इराणींसाठी खूप मोठी बाब आहे. माझे ऑस्कर इराणच्या जनतेला अपर्ण करतो. इराणचे लोक सर्व संस्कृतींचा आदर करतात आणि त्यांना दडपशाहीचा तिटकारा वाटतो,’ हे त्यांचे उद्गार फरहादींच्या समंजसपणाची साक्ष पटवणारे ठरले. फरहादी यांच्या या सिनेमाला मूळ पटकथा विभागातही नामांकन होते. फॉरेन लँग्वेज फिल्म विभागात ‘फुटनोट’ हा इस्रयली सिनेमाही होता.
ऑस्करमध्ये पाकिस्तान- लघुपटांच्या विभागात पाकिस्तानी लघुपट ‘सेविंग फेस’ला यंदा ऑस्कर मिळाले. अशा प्रकारे ऑस्करच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानी कलाकृतीला आणि व्यक्तीला (सहदिग्दर्शक शर्मीन ओबेद चिनॉय) हा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये महिलांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळते. त्यांच्या हत्या करणे किंवा ऍसिड फेकून त्यांना विद्रुप करणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. अशाच एका ऍसिड हल्ल्‌यात विद्रुप झालेल्या महिलेच्या चेहर्‍यावरील शस्त्रक्रिया हा या लघुपटाचा विषय आहे. ब्रिटनमधील डॉ. मोहम्मद जवाद त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे पाकिस्तानला येऊन अशा शस्त्रक्रिया करतात आणि अनेक महिलांना त्यांचा आत्मसन्मान परत मिळवून देतात. चिनॉय यांनी हे ऑस्कर पाकिस्तानातील पीडित महिलांना अर्पण केले.
 रहमान आणि अनिल अंबानी- ऑस्करमध्ये यंदा भारतीय उपस्थिती दोनच व्यक्तींपुरती मर्यादित होती. संगीतकार ए. आर. रहमान आणि उद्योगपती या त्या दोन व्यक्ती. रहमानने कोडॅक थिएटरच्या सुपरिचित गॅलरीत बसून सोहळ्याचे काही काळ संगीत संयोजन केले. या सोहळ्याला अनिल अंबानीही उपस्थित होते. त्यांच्या रिलायन्स बिग एंटरटेन्मेंट कंपनीचा स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या ड्रीमवर्क्समध्ये ५१ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे ‘द हेल्प’, ‘वॉर हॉर्स’ आणि ‘द रिअल स्टील’ या सिनेमांच्या निमित्त अंबानी उपस्थित होते. हे तिन्हे सिनेमे ड्रीमवर्क्सने बनवले आहेत.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, March 13, 2012,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS